क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या हिटलरच्या छळ छावण्या


क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या हिटलरच्या छळ छावण्या ,गॅस चेंबर आणि आपण : 

हिटलर इतका क्रूर राज्यकर्ता जगाच्या पाठीवर दुसरा कुणी झालेला नाही या बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही आणि तरीही भारतातील काही संघटनांचे आयडॉल हिटलर आहेत. हिटलर हे स्वतःला उच्च वर्णीय आर्य मानीत असत आणि ज्यू जनतेला नीच वर्णीय मानीत असत.या हलक्या ज्यू वर्णीय जनतेला हाल हाल करून मारणे हे जणू हिटलरच्या जीवनाचे ध्येय बनले होते. आणि त्यासाठी त्यांनी जर्मन, पोलंड या सारख्या देशात छळ छावण्या उभारल्या होत्या. त्या छळ छावण्यांमध्ये जू लोकांना हालहाल करून मारले गेले होते. आज त्या छळ छावण्या पहिल्या तरी अंगावर काटा उभा राहतो आणि त्या कल्पनेनेही माणूस अर्धमेला होता.श्वापदा पेक्षाही माणूस कसा हिंश्र असू शकतो ? ही कल्पनाही करवत नाही. हिटलरला श्वापद म्हणणे म्हणजे जंगली हिंश्र प्राण्यांचा अपमान केल्यासारखे होईल. ते प्राणी केवळ आपल्या उपजीविकेसाठी तसे वागतात पण हिटलर सारखा माणूस मात्र जेंव्हा वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने, अहंगंडाने पूर्णतः बेभान झालेला असतो, सैरभैर झालेला असतो, पिसाटलेला असतो, पिसाळलेला असतो, अशा पिसाळलेल्या अवस्थतेत तो इतरांचा छळ करीत असतो.
हिटलरच्या ह्या छळ छावण्या मला प्रत्यक्ष पाहता आल्या नाहीत पण दोन तीन दिवसांपूर्वी माझ्या चिरंजिवाने प्रत्यक्ष पहिल्या व त्याचे वर्णन केले ते ऐकतानाही अंगावर शहारे उभे राहत होते. तो एक सिनेमाच्या शूटिंग निमित्ताने स्लोवकियाला गेला होता तिथून दोन चार तासाच्या अंतरावर पोलंडच्या ह्या छळ छावण्या होत्या. तेथील फोटो पाहूनही मनाची कालवा कालव झाली.त्यांच्या ग्रुपला तेथील गाईड ने सांगितलेली माहिती प्रमाणे , ज्यू लोकांना या छळ छावण्यात आणतांना सांगितले गेली की आम्ही तुमच्या वसाहती दुसऱ्या ठिकाणी उभारल्या आहेत तेव्हा हे घरे खाली करा व सोबत आवश्यक तेवढेच समान घ्या. त्या प्रमाणे ज्यू लोकांनी बॅग, जेवणाची भांडी, कपडे असे साहित्य सोबत घेतले. त्यांना ट्रेन मध्ये बसवून येथे आणले गेले. ट्रेन मधून उतरल्या नंतर सर्वांना चेक करण्यासाठी एक डॉक्टर गेटवर नेमण्यात आला होता. केवळ तीन सेकंदात तो व्यक्ती पाहून निर्णय घेत असे. आजारी स्त्री पुरुष म्हातारे, कोवळी मुले यांची एक रांग तयार करीत असे तर तरुण धष्ट पुष्ट , सशक्त माणसांची दुसरी रांग तयार करीत असे. जे धष्ट पुष्ट होते त्यांना या छळ छावणीत आणून छळले जात असे तर म्हातारे, कोवळी मुले व रुग्ण यांचे जीवन त्याच वेळी संपविले जात असे. त्यांना मारून टाकले जात असे. 'ज्यू'ना हाल हाल करून मारण्यासाठी छळ छावण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. काही चार पाच फुटाच्या अंधाऱ्या खोल्या होत्या त्याला केवळ एक लहान छिद्र प्रकाशाची लहानशी तिरीप व हवा आत येण्यासाठी ठेवण्यात आले होते. बऱ्याचश्या कैद्यांना तिथे अन्न पाण्या वाचून ठेवले जाई व उपाशी ठेवून तडफडून तडफडून त्यांना मारण्यात येई. काही खोल्या अत्यंत लहान म्हणजे आपल्या लहान कापटा एवढ्या सर्वसाधारण दीड फूट रुंद दोन फूट लांब व साडेपाच सहा फूट उंच होत्या. यात माणूस केवळ उभा राहू शकतो. बसूही शकत नाही. त्या खोलीमध्ये ही खालच्या बाजूने होल ठेवलेला असे त्यातून माणसाला जबरदस्तीने घुसावे लागे. तात्पर्य तो एकदा आत गेला की त्याला बाहेर येता येत नसे. सर्व विधीही त्याच अवस्थतेत करावे लागे. छावणीला सर्व बाजूने तारेचे कुंपण असे जर कुणी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला लगेच शूट केले जाई. कोणतीही दया माया दाखवली जात नसे. किंचित जरी कुणी प्रतिकार केला तर त्यांचे हात मागे बांधून खांबावर लाटकविले जाई. जमिनीवर त्यांचे पाय टेकलेले नसे. तासन तास त्यांना शिक्षा म्हणून प्रथम असे हवेत लटकविले जात असे व नंतर खाली उतरवून ठराविक भिंतीजवळ नेऊन गोळी मारली जात असे. केवळ कल्पना करूनही अंगावर काटे उभे राहतात. गॅस चेंबर मोठे होते कारण त्यात एकाच वेळी अनेक माणसे कोंबली जात. व त्या चेंबरच्या वरील बाजूस असलेल्या लहान होलातून किंवा उंच अशा चिमणीतून विषारी ग्यासचा डबा फोडून खोली मध्ये टाकला जाई, आत येणाऱ्या विषारी गॅस मुळे माणसे तडफडून तडफडून मरत असत. मेलेल्या माणसांच्या अंगावरील कपडे काढून शवांना भट्टीत जाळून टाकीत असत.

स्त्रियांना छळ छावणीत आणल्या नंतर त्यांचे केस काढले जात असे. तेथील एक मोठी खोली केवळ स्त्रियांच्या केसांनी पूर्ण भरलेली आहे. ते केस विकले जात असत. पुरुषां प्रमाणेच स्त्रियांनाही हालहाल करून मारले जाई. तरुण स्त्रियांचा उपभोग घेतला जाई.तेथे एक प्रयोगशाळा बांधण्यात आली होती. सदर प्रयोग शाळेत तरुण मुलींवर वेगवेगळे प्रयोग केले जात असत. विशेष म्हणजे जनन प्रक्रिया लांबविण्याचे प्रयोग केले जात , त्यामुळे त्यामुळे त्यांचा भोग घेणे ओघाने आलेच. जगात सर्वत्र असे प्रयोग उंदीर किंवा माकडांवर केले जातात पण येथे प्रत्यक्ष तरुणींवर असे प्रयोग केले जात होते. 
पोलंड सरकारने त्या छळ छावण्या व ज्यू लोकांचे साहित्य जपून ठेवले आहे. एक खोलीत मारलेल्या ज्यू लोकांचे चष्मे आहेत, एक ठिकाणी त्यांच्या चपला, एका ठिकाणी त्यांची भांडी तर एक खोलीत त्यांच्या बॅगा जतन करून ठेवल्या आहेत. त्या बॅगा वर त्यांची नावे लिहिली आहेत. मारल्या गेलेल्या ज्यू जनतेची लिस्ट तयार करून त्यामध्ये त्यांची नावे, वय व इतर माहिती आहे. त्या लिस्ट दर्शनी भागी लावल्या आहेत. ते सर्व साहित्य बघून आपल्याला गहिवरून आल्या शिवाय राहवत नाही. 
माणूस वर्ण, वर्ग ,धर्म किंवा जाती श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पछाडला गेला की तो कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतो हे याचे उत्तम उदाहरण आहे. जगात पुन्हा असा क्रूरकर्मा निर्माण होऊ नये असे वाटत असेल तर अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे हे जगातील सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणही त्यास अपवाद नाही.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

वर्षावास अर्थात गुरु पौर्णीमा

जागतिकीकरण